येवला ग्रामीण शाखेत जीवनकार्यावर जनजागृती; हिंदू एकता, समाज संघटन आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन
येवला | प्रतिनिधी
श्रद्धेय अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या येवला ग्रामीण ममदापूर शाखेच्या वतीने जन्मशताब्दी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अशोकजी सिंगल यांच्या जीवनकार्याची माहिती देण्याबरोबरच हिंदू एकता आणि समाज संघटन या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अशोकजी सिंगल यांचे जीवनचरित्र आणि राष्ट्रनिर्मितीसाठी त्यांनी केलेले कार्य समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवून समाजात जनजागृती निर्माण करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम प्रकृती प्रमुख अॅड. शैलेशजी भावसार, मालेगाव जिल्हा धर्मप्रसार आयाम प्रमुख अण्णासाहेब सोमासे, येवला तालुका अध्यक्ष प्रदीपजी लभडे, प्रखंड संयोजक गणेशजी काबरा, सहसंयोजक अनुराग पहाडी आणि धर्माचार्य प्रमुख जानकीदास महाराज वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ग्रामस्थ आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाज संघटन, एकता आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील सहभागाचे महत्त्व विशद केले. एकत्र आलेल्या समाजाने संघटित राहून सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर येवला शहरातील विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या येवला प्रखंडातील विविध शाखांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ममदापूर येथे झालेला हा कार्यक्रम ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहात पार पडला.








