पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील प्रलंबित देणी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे वितरित; सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या निर्णयाचे ऊस उत्पादकांकडून स्वागत
निफाड | प्रतिनिधी
केजीएस शुगर कारखान्याने बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्वीच्या कारखाना व्यवस्थापनाकडून थकीत असलेल्या ऊस बिलांची रक्कम शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे अदा केली. चेअरमन संजय होळकर यांच्या पुढाकारातून होळकर कुटुंबीयांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आर्थिक अडचणीच्या काळात त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून (एनसीएलटी) प्राप्त झालेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांची थकीत देणी अदा करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांनी फॉर्म बी भरला नसल्यामुळे त्यांना यापूर्वी पेमेंट मिळू शकले नव्हते. या थकबाकीची जबाबदारी सध्याच्या व्यवस्थापनावर नसतानाही सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी हित लक्षात घेऊन स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रलंबित देणी अदा करण्याचा निर्णय होळकर कुटुंबीयांनी घेतला.
यावेळी कारखाना व्यवस्थापनाने सांगितले की, हा कारखाना केवळ नफा कमावण्याच्या उद्देशाने विकत घेतलेला नाही. कर्मवीर चांगदेव पाटील होळकर आणि त्यांचे सहकारी कर्मवीर प्रल्हाद पाटील कराड यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील साखर कारखाने बंद पडल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली परवड थांबवणे, तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी श्री. मंगरूळ, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. आव्हाड, प्रभाकर रायते, बाळनाथ शिंदे, रामदास शिंदे, संचालिका सोनिया होळकर, किशोर होळकर आणि कार्यकारी संचालक आदित्य होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रकाश दायमा यांनी केले, तर कार्यकारी संचालक आदित्य होळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
थकीत ऊस बिलांची रक्कम अदा केल्याबद्दल उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चेअरमन संजय होळकर आणि संचालक मंडळाचे आभार मानले. तसेच यापुढे आपला ऊस केवळ केजीएस साखर कारखान्यालाच पुरवठा करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी हिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.






