प्रामाणिकपणाचे चांदवडमध्ये कौतुक; पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा हरवलेला दागिना सुखरूप परत
चांदवड | प्रतिनिधी :
मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर अनेकजण मोहाला बळी पडतात; मात्र माणुसकी आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देणारेही समाजात आहेत, याचा प्रत्यय चांदवड येथे आला. रस्त्यावर सापडलेली सोन्याची पोत स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या राजेंद्र सुरेश बनकर यांच्या कृतीमुळे एका महिलेचा हरवलेला दागिना सुखरूप परत मिळाला. चांदवड पोलिसांनीही तत्परता दाखवत अवघ्या काही वेळात दागिना मूळ मालकाच्या स्वाधीन केला.
हिवरखेडे येथील शोभा दत्तू आहेर यांची मणी मंगळसूत्राची सोन्याची पोत सोमवार पेठेतील पन्हाळकर इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर हरवली होती. ही पोत राजेंद्र सुरेश बनकर यांना सापडली. कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यांनी ती चांदवड पोलिसांकडे सुपूर्द केली. आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेत हा दागिना मूळ मालक शोभा आहेर यांना सुरक्षितपणे परत केला. हरवलेला मौल्यवान दागिना परत मिळाल्याने आहेर यांनी समाधान व्यक्त केले.
“सोन्याची किंमत पैशांत मोजता येते; मात्र प्रामाणिकपणाचे मोल त्याहून मोठे असते, हे राजेंद्र बनकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले,” असे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी सांगितले.










