ऊस वाहतूकदार व बैलगाडी चालकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
कुरुंदवाड | प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी ऊस वाहतूकदार आणि बैलगाडी चालकांसाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे चालकांना सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईही केली जात आहे.
रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने आणि बैलगाड्या इतर वाहनचालकांना सहज दिसाव्यात, तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच बैलगाडीच्या मागील लोखंडी रॉडला आणि बैलांच्या शिंगांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय रहदारीच्या किंवा गर्दीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उभा करून चालकांनी निघून जाऊ नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, दुहेरी ट्रॉली जोडून ऊस वाहतूक टाळावी आणि वाहनांमध्ये मोठ्या आवाजात कर्णकर्कश साउंड सिस्टिम लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ५५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच संबंधित चालकांविरोधात खटलेही दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील तसेच पोलीस कर्मचारी सागर खाडे आणि किशोर माळी यांच्या पथकामार्फत राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधासाठी पोलिसांकडून जनजागृती व कारवाई सुरू आहे.










