अधिकारी-कर्मचारी संघटनांचा निषेध; प्रशासकीय कामकाज प्रभावित, नगरसेवक संजय गव्हाळे यांनी आरोप फेटाळले
अमरावती | प्रतिनिधी :
अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ (दस्तूर नगर) कार्यालयात सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महापालिका अधिकारी व कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे महापालिकेचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले असून, सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थकीत कराच्या वसुलीसाठी एका मंगल कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईच्या वादातून २० नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. सहायक आयुक्त नितीन बोबडे यांच्या दालनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घालत बोबडे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेनंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, नगरसेवक संजय गव्हाळे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित अधिकाऱ्यानेच आपल्याशी अरेरावीची आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
या घटनेमुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांची दैनंदिन कामे रखडत असल्याने या वादावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रशासकीय कामकाज सुरळीत करावे, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करत आहेत.










