महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन; ज्येष्ठ पत्रकार भारत कवितके यांची माहिती
मुंबई | प्रतिनिधी :
महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त ३ डिसेंबर २०२६ रोजी राज्यभरात विविध ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म ३ डिसेंबर १७७६ रोजी पुण्याजवळील किल्ले वाफगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी होळकर आणि आईचे नाव यमुनाबाई होते. काशीराव, मल्हारराव आणि विठोबाराव हे त्यांचे थोरले बंधू होते. ६ जानेवारी १८०५ रोजी राज्याभिषेक सोहळ्यानंतर त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.
महाराजा यशवंतराव होळकर हे कर्तबगार वीर पुरुष आणि कुशल राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. संकटांचा सामना करण्याची जिद्द, युद्धकौशल्य, नेतृत्वक्षमता, दुर्दम्य आशावाद, क्षमाशीलता आणि प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाण्याची वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे गुण होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया लढत त्यांना कडवी झुंज दिली. इंग्रजांचा अठरा वेळा पराभव करून त्यांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिल्याचे सांगितले जाते.
अशा या शूरवीर महाराजांचा मृत्यू २८ ऑक्टोबर १८११ रोजी मध्य प्रदेशातील भानपुरा येथे झाला. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक कार्याचे स्मरण करून २५० व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे भारत कवितके यांनी कळविले आहे.










