हेक्टरला एक लाख रुपये अनुदान, सोयाबीनला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव आणि मायक्रोफायनान्स कर्जाचे हप्ते थांबविण्याची मागणी
दरेगाव | प्रतिनिधी :
बुलढाणा जिल्ह्यात दि. १४ नोव्हेंबरपासून रविकांत तुपकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, गावोगावी त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे. यात्रेदरम्यान आयोजित सभांना हजारो नागरिक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.
या संघर्ष यात्रेद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावा, तसेच मायक्रोफायनान्स कर्जाचे हप्ते सध्या थांबविण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या रविकांत तुपकर यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत.
या मागण्यांसाठी त्यांनी आपल्या भाषणातून सरकारला साकडे घातले आहे. त्यांच्या या भूमिकेला परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांकडून पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संघर्ष यात्रेचा समारोप ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणार आहे. यावेळी हजारो शेतकरी एकत्र येण्याची अपेक्षा असून, बुलढाणा येथे जाहीर सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे.









