मुख्य चौक व बाजारपेठेत नागरिकांची गैरसोय; अतिक्रमण हटवून अनधिकृत ऑटो थांब्यांवर कारवाई करण्याची मागणी
अकोट | प्रतिनिधी :
जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढती लोकसंख्या, बाजारपेठेतील गर्दी आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. त्यातच रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अनधिकृत ऑटो रिक्षांच्या गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटल्याने रस्त्यांचा मोठा भाग व्यापला जात आहे. अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ऑटो रिक्षा उभ्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सोनू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक तसेच नरसिंह रोड परिसरात ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.
विशेषतः बाजारपेठ परिसरात फेरीवाल्यांची गर्दी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि ऑटो रिक्षांची वर्दळ यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अल्पवयीन चालकांकडून ऑटो रिक्षा चालविल्या जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
अकोट शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषद प्रशासन, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे ठोस पावले उचलण्याची गरज आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, अनधिकृत ऑटो थांब्यांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
अकोट शहरातील रस्ते नागरिकांच्या वापरासाठी मोकळे राहणार की अतिक्रमणधारकांच्याच ताब्यात राहणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अकोटकर नागरिकांकडून होत आहे.











