जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल यात्रा कमिटी व ग्रामस्थांकडून गौरव; रामेश्वर महाराज देवस्थानाला सदिच्छा भेट
गुंडेगाव | प्रतिनिधी :
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे श्री रामेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त देवस्थानाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री रामेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आमदार कर्डिले यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. देवस्थानच्या विकासकामांबाबत त्यांनी यात्रा कमिटीकडून माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधून गावातील विविध समस्या समजून घेतल्या.
यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की, श्री रामेश्वर महाराज देवस्थान हे गुंडेगाव परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. या गावाशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. गावातील विकासकामे असोत किंवा शासकीय कामे, दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांनी कायम मदतीची भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या प्रेमामुळेच आपण आमदार होऊ शकलो असून, गावातील समस्या सोडविण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऐतिहासिक रामेश्वर मंदिराची ग्रामस्थांनी एकत्र येऊन जोपासना केली आहे. ग्रामस्थांची एकजूट आणि श्रद्धा कौतुकास्पद असून, परमेश्वराची कृपा सर्वांवर कायम राहो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी गुंडेगावचे ज्येष्ठ नेते बबनराव हराळ पाटील, रेवणनाथ चोभे, नानासाहेब हराळ, उपसरपंच संतोष भापकर, विठ्ठल भापकर, रंगनाथ भापकर सर, रामकृष्ण कुताळ, दादासाहेब जाधव, गणेश हराळ, तुषार जाधव, बाळासाहेब देशमुख, रावसाहेब कोतकर, संतोष कोतकर, बापू चौधरी, विक्रम भापकर, आकाश भापकर, काशिनाथ चौधरी, के. डी. हराळ, नाथा जरे, बाळासाहेब पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.










