रावणगाव येथे ‘दुष्काळी परिस्थितीत शाश्वत शेती’ प्रशिक्षण; सेंद्रिय शेती आणि गावरान बियाण्यांच्या प्रसारातील योगदानाची दखल
जळकोट | प्रतिनिधी :
जळकोट तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागातील अतनूर येथील रहिवासी, पत्रकार तथा कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे (अतनूरकर) यांचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेती, गावरान बियाणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), लातूर आणि ‘आत्मा’ कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी उदगीर तालुक्यातील रावणगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भीमराव डोनगापुरे यांच्या शेतावर ‘दुष्काळी परिस्थितीत शाश्वत शेती’ या विषयावर हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ. सुब्रोतो कुमार रॉय उपस्थित होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस सौ. आशाताई भिसे, विभागीय कृषी सहसंचालक महेश कुमार तीर्थकर, डॉ. पी. आर. देशमुख आणि प्रा. अरुण गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान बालासाहेब शिंदे यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. सेंद्रिय शेती, गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची यावेळी दखल घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. पी. जाधव, मनीषा बांगर, डॉ. वसंत सूर्यवंशी, प्रा. संदीप देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील शेतकरी आणि कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










