१९८३ आणि १९८४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे पुनर्मिलन; शाळेत पुन्हा भरला वर्ग
पुरंदर | प्रतिनिधी :
तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळी (ता. पुरंदर) येथील कृषी औद्योगिक विद्यालयातील १९८३ आणि १९८४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, या निमित्ताने शाळेत पुन्हा वर्ग भरवण्यात आला आणि माजी विद्यार्थी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत बाकांवर बसले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष संगीता क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गुरुजनांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दादासो मर्दाने, श्रीरंग पवार आणि सरपंच गोपाळ कामठे आदी उपस्थित होते. तसेच कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष सुरेश फडतरे आणि मुंबई जिल्हा सहकारी हौसिंग फेडरेशनच्या संचालिका सविता झेंडे यांचाही सत्कार करण्यात आला.
१९८३ आणि १९८४ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि सर्वांना एकत्र आणणे हे मोठे आव्हान होते. माजी विद्यार्थी तथा चांबळीचे माजी सरपंच संजय आबा कामठे, मारुती भाऊ कामठे, संजय शेंडकर, मोहन कटके आणि मछिंद्र जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत आदी गावांतील माजी विद्यार्थी एकत्र आले.
मेळाव्यात प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील वाटचाल, सध्याचे वास्तव्य, व्यवसाय आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. काही जण अभियंता, वैद्यकीय क्षेत्रात, तर काही जण एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पारंपरिक रसवंती व्यवसाय, शेती, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनीही आपले अनुभव सांगितले. फिशपॉइंटचा कार्यक्रम, हास्यविनोद, टाळ्यांचा कडकडाट आणि केक कापून साजरा केलेला आनंद यामुळे मेळाव्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेप्रती असलेली माजी विद्यार्थ्यांची बांधिलकीही व्यक्त झाली. उपस्थितांसाठी संजय आबा कामठे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. मारुती भाऊ कामठे यांनी स्वागत केले. संजय शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर निवृत्ती कामठे यांनी आभार मानले.
चार दशकांनंतर पुन्हा शाळेचा वर्ग भरला, गुरुजनांसमोर विद्यार्थी म्हणून बसण्याचा अनुभव मिळाला आणि जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेने दिलेली मैत्री आणि संस्कार आजही माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणात असल्याचे या स्नेहमेळाव्यातून दिसून आले.










