झुकलेल्या वीजखांबाबाबत वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप; पंचनामा करून कारखान्यांनी तातडीने तोडणी टोळी द्यावी, मागणी
माजलगाव | प्रतिनिधी :
माजलगाव तालुक्यातील उमरी बु. शिवारात विद्युत प्रवाहामुळे लागलेल्या आगीत तुकाराम घायतीडक यांच्या शेतातील एक एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाईसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तुकाराम घायतीडक यांची उमरी शिवारातील एक बुर्जी परिसरात जमीन आहे. त्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली असून, तेथील वीजखांब झुकलेल्या अवस्थेत होते. याबाबत संबंधित वीज कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही दुरुस्ती करण्यात आली नाही, असा आरोप घायतीडक यांनी केला आहे.
झुकलेल्या वीजखांबांमुळे विद्युत प्रवाहाच्या ठिणग्या पडून ऊसाला आग लागल्याचे त्यांनी सांगितले. वेळीच वीजखांबांची दुरुस्ती केली असती, तर ऊस जळाला नसता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानाची नोंद घ्यावी. तसेच जय महेश कारखाना आणि तेलगाव कारखाना यांनी ऊसतोडणीसाठी तातडीने टोळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तुकाराम घायतीडक यांनी केली आहे.











