फरशा उखडल्या, परिसरात दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याचा खच; स्वच्छता, दुरुस्ती आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
कवठे महांकाळ | प्रतिनिधी :
जत ते कराड या मुख्य मार्गावरील नागज येथे प्रवाशांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार आर. आर. पाटील यांच्या आमदार निधीतून पिकअप शेड तथा बसस्थानक बांधण्यात आले होते. मात्र, सध्या या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटख्याचे पुडे पडलेले असल्याचे चित्र आहे. बसस्थानकाचा वापर मद्यपानासाठी केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बसस्थानकातील फरशा अनेक ठिकाणी उखडल्या असून काही ठिकाणी त्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी आणि थांबण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा साचल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे.
या बसस्थानकापासून अवघ्या १०० फुटांवर आयुष्यमान मंदिर (आरोग्य मंदिर) आहे. येथे गावातील रुग्ण, महिला आणि लहान मुले उपचारासाठी येतात. मात्र, बसस्थानक परिसरात मद्यपान होत असल्याने महिला आणि विद्यार्थ्यांना तेथे थांबणेही अवघड होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आमदार निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या सुविधेची काही वर्षांतच दुरवस्था झाली असताना संबंधित प्रशासनाकडून देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागज बसस्थानकाची तातडीने स्वच्छता करून उखडलेल्या फरशांची दुरुस्ती करावी, रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था करावी, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आमदार निधीतून उभारलेली सार्वजनिक सुविधा अशीच दुर्लक्षित राहणार का, असा सवाल नागजमधील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.











