राधाकृष्ण विखे पाटील आणि राजू शेट्टी यांच्या बैठकीत निर्णय; ३,२५० रुपये पहिली उचल, उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देणार
अहिल्यानगर | प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,४५० रुपये दर देण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनानंतर ही बैठक पार पडली.
बैठकीत राजू शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये झालेल्या तोडग्याप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातही ऊसदर निश्चित करावा, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार साखर कारखाने लवकर सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा (रिकव्हरी) दीड टक्क्याने घटला आहे. परिणामी कारखान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शेतकऱ्यांना एफआरपी देणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. साखर उतारा घटल्यामुळे शेतकऱ्यांनाही प्रतिटन ५३४ रुपयांचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यापूर्वी प्रतिटन ३,००० ते ३,१५० रुपये दर जाहीर केला होता. मात्र, बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता प्रतिटन ३,४५० रुपये किमान दर देणे बंधनकारक राहणार आहे. यापेक्षा अधिक दर देऊ इच्छिणाऱ्या कारखान्यांना कोणतेही बंधन असणार नाही.
जाहीर दरापैकी प्रतिटन ३,२५० रुपये पहिली उचल म्हणून दिले जाणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात १०० रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी उर्वरित १०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय भविष्यात साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक झाल्यास ७०/३० या सूत्रानुसार शेतकऱ्यांना अंतिम दर देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक सहसंचालक (साखर), जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.










