दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनात तालुक्यातील बालवैज्ञानिकांचा सहभाग; पाच गटांत प्रयोग आणि शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण
केज | प्रतिनिधी :
५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे संपन्न झाले. गटशिक्षणाधिकारी कार्यालय, केज आणि साने गुरुजी निवासी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात उच्च प्राथमिक विद्यार्थी गट (इयत्ता सहावी ते आठवी), माध्यमिक विद्यार्थी गट (इयत्ता आठवी ते बारावी), अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गट (इयत्ता पहिली ते आठवी), अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक शिक्षक गट (इयत्ता नववी ते बारावी) आणि प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट अशा पाच गटांचा समावेश होता.
तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांचे स्पष्टीकरण देत सादरीकरण केले.
उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गणेश गिरी, साने गुरुजी निवासी विद्यालयाचे उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे उपाध्यक्ष राजेश कापसे, बोराडे, सोनवणे, थोरात, नखाते, गव्हाणे, फड, ठोंबरे आणि चव्हाण यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, विशेष शिक्षक, साधनव्यक्ती आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
२७ नोव्हेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. परीक्षकांनी सादर केलेल्या निकालानुसार प्रत्येक गटातील गुणानुक्रम निश्चित करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी अक्षय लहू ढोले आणि तालुक्यातील केंद्रप्रमुखांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बालवैज्ञानिकांच्या उत्साही वातावरणात समारोपाचा कार्यक्रम पार पडला.
प्रदर्शनाच्या आयोजनासाठी साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. कविता कराड-गित्ते आणि विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक आणि साधनव्यक्तींनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहाने मॅडम यांनी केले. गणेश लक्ष्मणराव वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले. परीक्षकांनी प्रदर्शनाचा निकाल सादर केला. गटशिक्षणाधिकारी अक्षय ढोले यांनी अध्यक्षीय समारोप केला, तर भारत मदने यांनी आभार प्रदर्शन केले.










