वाहकावर कारवाई करण्याची मागणी; निवेदनाच्या प्रती जळगाव आणि मुंबई येथील एसटी प्रशासनाकडे रवाना
मुक्ताईनगर | प्रतिनिधी :
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदूर येथील ज्येष्ठ नागरिक मोहन चुनिलाल भोई (वय ७०) यांना भुसावळ ते मुक्ताईनगर एसटी बस प्रवासादरम्यान पूर्ण तिकीट काढण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीएमएस कार्डमध्ये बॅलन्स असतानाही कार्डचा वापर न करता वाहकाने उद्धट भाषेत संभाषण केल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, मोहन भोई भुसावळ ते मुक्ताईनगर प्रवास करत असताना संबंधित बसच्या वाहकाने एनसीएमएस कार्ड क्रमांक ८१८१११००२१७६ वापरले नाही. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून, पैसे नसतील तर बसमधून खाली उतरा, अशा शब्दांत संभाषण केल्याचा आरोप आहे. कार्डमध्ये बॅलन्स किंवा टॉपअप उपलब्ध असतानाही त्यांना पूर्ण तिकीट काढण्यास भाग पाडण्यात आले. या मार्गाचे पूर्ण तिकीट १०० रुपये असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० रुपये भाडे असताना १०० रुपयांचे तिकीट घ्यावे लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित वाहकाचे नाव एम. पी. महाले असून त्यांचा बिल्ला क्रमांक ५२७७३ आणि आगर क्रमांक AKLCBS56 असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अतिरिक्त पैसे वसूल करणे आणि प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे, अशा प्रकारांची चौकशी करून संबंधित वाहकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी आगरप्रमुख, मुक्ताईनगर यांच्याकडून संबंधित वाहकाविरोधात कारवाईसाठी पत्र देण्यात येणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदनाच्या प्रती एसटी डेपो हेड ऑफिस, जळगाव आणि एसटी महामंडळाचे मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात योग्य माहिती देऊन सन्मानपूर्वक सेवा द्यावी. कार्डमध्ये रिचार्जची अडचण असल्यास रिचार्ज करून तिकीट द्यावे किंवा नियमानुसार आधार कार्डच्या आधारे अर्धे तिकीट देण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारांना मनसे सहन करणार नसल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, हरताळा गट उपाध्यक्ष सुनील कोळी, प्रहार सेना तालुका उपाध्यक्ष उत्तम जुमडे, गणेश पाटील, संजीव सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.










