शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न
शाहूवाडी | प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे पैकी पेढेवाडी येथे बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागून पाच घरांचे नुकसान झाले. या आगीत सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अर्जुन शंकर घोडके यांच्या घराच्या छपरातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ सतर्क होत घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील चार घरांनाही आग लागली.
प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी मलकापूर अग्निशमन दलाला पाचारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि नागरिकांनी प्रयत्न केले.
या आगीत सुरेश लव्हटे, बाळू लव्हटे, आनंदा लव्हटे, गुंडा लव्हटे आणि हिंदुराव लव्हटे यांच्या घरांचे नुकसान झाले. एकूण नुकसान सुमारे १७ लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेचा पंचनामा तलाठी पल्लवी पाटील आणि ग्रामसेविका राणी मुंडे यांनी केला.










