१४ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेची दखल; गर्भावस्थेतही सांभाळली वसतिगृहाची जबाबदारी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पित कार्य
वावळोली (ता. सुधागड) | प्रतिनिधी :
“शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकवणारा घटक नसतो, तर तो एका पिढीचे भविष्य घडवणारा खरा शिल्पकार असतो,” या उक्तीला आपल्या कार्यातून, त्यागातून आणि जिद्दीतून सार्थ ठरवणाऱ्या कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, वावळोली (ता. सुधागड) येथील माध्यमिक शिक्षिका सौ. सरिता दुर्गादास शिद (पूर्वाश्रमीच्या कु. सरिता धर्मा बांगारे) यांना प्रतिष्ठेच्या ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए४ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, सावरसई (ता. पेण, जि. रायगड) येथे ‘उत्कृष्ट शिक्षक सन्मान समारोह’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पेणच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे आणि लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१ ए४ चे जिल्हा शिक्षक समिती अध्यक्ष एमजेएफ लायन यशवंत चित्रे यांच्या हस्ते सौ. सरिता शिद यांचा १४ वर्षांच्या निस्वार्थ शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, शासनाचे व संस्थेचे पदाधिकारी, प्रकल्पातील विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आणि इतर पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुधागड तालुक्यातील घोडगाव हे मूळ गाव असलेल्या आणि आदिवासी समाजात जन्मलेल्या सौ. सरिता शिद यांचे प्राथमिक शिक्षण नांदगाव येथे झाले. वडिलांच्या बदलीमुळे त्या खोपोली येथे स्थायिक झाल्या. तेथेच त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करून पदवी संपादन केली. त्यांचे वडील वावळोली आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी होते, तर आईने दुसऱ्या आश्रमशाळेतून शिक्षण घेतले होते. आश्रमशाळेच्या संस्कारांचा वारसा पुढे नेत त्यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातून बी.एड. ही व्यावसायिक पदवी प्राप्त केली.
२०१२ मध्ये ज्या वावळोली आश्रमशाळेत त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून रुजू होण्याचा मान त्यांना मिळाला. नोकरी करतानाही स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी जिद्दीने एम.ए. आणि डी.एस.एम. हे उच्च शिक्षण पूर्ण केले.
संसार आणि कर्तव्याचा समतोल साधणारी ‘आदिवासी हिरकणी’
कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक कर्तव्य यांचा समतोल साधत सौ. सरिता शिद यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शासन व प्रशासनाने सोपविलेली निवडणूक कामे, क्रीडा स्पर्धांचे नियोजन तसेच कोरोना काळातील खावटी वाटप अशा विविध शासकीय उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थिनींच्या काळजीपोटी गर्भवती असतानाही त्यांनी वसतिगृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. प्रसूतीनंतर मुलगी लहान असतानाही बाळाला सोबत घेऊन शाळेची कामे आणि वसतिगृहातील मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी मायेने निभावली. मातृत्व आणि कर्तव्य यांचा समतोल साधत त्यांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १४ वर्षांची अविरत धडपड
गेल्या १४ वर्षांपासून आश्रमशाळेलाच आपले कुटुंब मानून त्यांनी आदिवासी समाजातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, हा ध्यास घेतला. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोविड काळात स्वतः पदरमोड करून विद्यार्थ्यांच्या घरोघरी पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य पोहोचविले. अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे दहावीच्या (SSC) निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात त्यांचे योगदान राहिले. क्रीडा क्षेत्रातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश संपादन केले.
याशिवाय, स्वतःची स्वयंसेवी संस्था (NGO) स्थापन करून रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक जतनासाठी त्या अविरत कार्यरत आहेत.
या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सौ. सरिता शिद म्हणाल्या, “कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक यांनी मला माझ्याच आदिवासी समाजाची आणि विद्यार्थ्यांची सेवा करण्याची अनमोल संधी दिली. त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन. संस्थेचे पदाधिकारी, आई-वडील आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. आज मिळालेला हा सन्मान केवळ माझा नसून, तो माझ्या आदिवासी समाजाचा आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचा आहे. मी हा पुरस्कार त्यांनाच समर्पित करीत आहे.”
सौ. सरिता शिद यांच्या या सन्मानाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.











