पात्रुड येथील आंदोलनानंतर लहामेवाडी फाटा येथे कामाचा शुभारंभ; दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना
प्रतिनिधी :
माजलगाव–तेलगाव–धारूर–केज या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 548C) दुरुस्तीसाठी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पात्रुड येथे करण्यात आलेल्या जनआंदोलनाला यश आले आहे. २७ नोव्हेंबर रोजी पात्रुडजवळील लहामेवाडी फाटा येथे मोहन जगताप यांच्या हस्ते रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) प्रशासनाने १० नोव्हेंबरपासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. काही तांत्रिक कारणांमुळे कामाला विलंब झाला. मात्र, सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
कामाच्या शुभारंभावेळी सुरू असलेल्या दुरुस्तीची पाहणी करण्यात आली. रस्त्याचे काम मजबूत, दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या मार्गावर पुढील काही दिवस दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी वाहने सावकाश व काळजीपूर्वक चालवावीत. तसेच काम करणाऱ्या यंत्रणेला आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मोहन जगताप यांनी केले.
या कामासंदर्भात नागरिकांना कोणतीही तक्रार, सूचना किंवा अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. जनतेच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम सुरू झाले असून, रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.










