शिरोळ तालुका प्रतिनिधी / लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपयांची लाच दिली जात आहे. महिलांना ही लाच नको असून त्यांना संरक्षण, स्वाभिमान आणि आदर हवे आहे. महिलांनी ठरविले तर अशक्यही शक्य होते. महिला या शक्तीचे रूप असून महिलांचा आशीर्वाद असेल तर विजय हा निश्चित असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान करणारे 50 खोक्यांचे महायुतीचे सरकार ते घालवू शकतात. यासाठी दबावात येऊन चालणार नाही. महिलांना दिलखुलास जगण्याचा अधिकार देणाऱ्या आणि आपल्या लेकींच्या, बहिणींच्या सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.
शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ अ. लाट येथील ग्रामदैवत कलेश्वर मंदिर पटांगणात आयोजित भव्य नारीशक्ती संवाद मेळावा व मविआ जाहीर प्रचार सभेत त्या बोलत होत्या. गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वातीताई कोरी म्हणाल्या, देशातील आई, बहिण, कन्या सुरक्षित नसतील तर 1500 रुपये घेऊन काय करायचे. आम्हाला 1500 रुपये देऊन लाचार करणारे सरकार नको तर महिलांना सन्मान देणारे, त्यांचे रक्षण करणारे, महिलांना रोजगार देऊन त्यांच्या पायावर उभे करणारे सरकार हवे आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही निष्ठा आणि विश्वासघाताची आहे. स्वच्छ चारित्र्याचे लोकच स्वच्छ आणि सुरक्षित सरकार देऊ शकतात निष्ठावंत, चारित्र्यसंपन्न, संयमी म्हणून ओळख असणारे गणपतराव पाटील हे महिलांना सन्मान देण्याचे आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचे निश्चित काम करतील असा विश्वास आहे.
माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, आमदारांना विकत घेऊन सरकार स्थापन करता येते ही पद्धत प्रथमच देशात घडली. 50 खोके घेऊन आमदारांनी स्वतःचे बाजारीकरण करून घेतले. आमदारकी मधून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. तुम्ही विश्वासाने राहिलात का ? जातीवाद्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात? हा प्रश्न आमदारांना आपण विचारला पाहिजे. मी मतदारांना विकत घेऊ शकतो अशी भावना त्यांची असून कोणी जर स्वाभिमान विकत घेत असेल तर त्याला बळी पडायचे नाही. गणपतराव पाटील यांच्यासारख्या पुरोगामी विचार जपणाऱ्या आणि विचारांशी तडजोड न करणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून दिल्यास तालुक्याचा प्रचंड मोठा विकास होऊ शकतो.
गणपतराव पाटील म्हणाले, सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचे हित जपण्यासाठी आणि शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. हात या चिन्हासमोरील 1 नंबरचे बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा. काँग्रेसचे निरीक्षक साके शैलजानाथ, राहुल खंजिरे, भवानीसिंह घोरपडे, सरलाताई पाटील, रमेश शिंदे, मंगलाताई चव्हाण, स्वाती सासणे, अर्चना चौगुले, शामराव कुलकर्णी, स्मिता काळे, अभय बोरगावे, किरण कुरणे, डॉ वृषभ चौगुले, जीवन बरगे, शर्मिला टाकवडे, भाग्यश्री कांबळे, कु. वेदिका भुजुगडे, कु. बुशिरा खोंदू, नागेश कोळी आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक कु. प्रिती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार सतीश पाटील यांनी मानले.
विकास कांबळे, वैभव उगळे, मधुकर पाटील, विक्रमसिंह जगदाळे, इंद्रजित कदम, हसन देसाई, जयेश कांबळे, किरण भोसले, सतीश भंडारे, मिनाज जमादार, अनिता कोळी, अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, स्नेहा देसाई, कविता चौगुले, शशिकला पाटील, शकुंतला हातरोटे, उदय कदम, विनीत देसाई, राजेश बोरगावे, गजानन पाटील, सुनिता पाटील यांच्यासह मविआ व मित्र पक्षांमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिरोळ विधानसभा मतदार संघातील महिला व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post