ठाणे जिल्ह्यात महायुतीला शिवसेनेच्या बंडखोरांचे तगडे आवाहन
डोंबिवली, ऐरोली, कल्याण पूर्व मतदार संघांमध्ये चुरस
प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण
संपर्क :९९३०७५१२५७
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीतून एक वेगळे प्रारूप समोर येत असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या बंडखोरांनी भाजपच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे.
ऐरोली, बेलापूर आणि कल्याण पूर्व या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारासमोर शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोर उभे ठाकले आहेत तर, डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात ठाकरे गटातून उभे ठाकलेले दीपेश म्हात्रे हे एकेकाळी शिंदे यांच्या खास मर्जीतील समजले जात. असे असताना या बंडखोरांना थोपवण्यात शिंदे अपयशी ठरले की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, यावर आता भाजपच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. यापैकी बहुतांश आमदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली असली तरी, त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेतून बंडखोरी करून उमेदवार उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्व आणि नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली या तीन मतदारसंघांत ही बंडखोरी थेट दिसून येत आहे तर भाईदर मतदारसंघात भाजपच्या नरेंद्र मेहता यांच्याविरोधात अपक्ष उभ्या ठाकलेल्या गीता जैन या शिंदे गटाच्या सहयोगी अपक्ष आमदार आहेत. नवी मुंबईतील बेलापूर येथे शिवसेनेचे विजय नाहटा यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे तर, ऐरोलीत गणेश नाईक यांच्याविरोधात शिंदे यांच्या शिवसेनेचे विजय चौगुले यांनी दावेदारी केली आहे. चौगुले यांचे बंड रोखण्यासारखे असूनही ते का रोखले गेले नाही असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे दीपेश म्हात्रे यांच्यासारखा मुख्यमंत्र्यांचा कडवासमर्थक थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाऊन रवींद्र चव्हाण यांना आव्हान कसे उभे करू शकतो असा सवालही आता भाजपच्या वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी दोन ते तीन महिने दीपेश यांनी मंत्री चव्हाण यांच्या संबंधित नागरी समस्या, फलकबाजी करत वातावरण तापविण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांची पक्षाकडून कानउघाडणी करण्यात आली. परंतु, त्यापलीकडे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. डोंबिवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असतानाही दीपेश म्हात्रे ज्या जोरकसपणे प्रचारात उतरले आहेत, त्यावरून त्यांना रवींद्र चव्हाण विरोधातील मंडळींकडून पाठबळ मिळत असल्याचीही चर्चा आहे.
बंडखोरीच्या परिणामाबाबत साशंकता…
कल्याण पूर्वेत शिवसेना (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख महेश गायकवाड दोन वर्षांपासून भाजपचे गणपत गायकवाड यांच्या विरोधात काम करत होते. आता तर उघडपणे महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज भरून महेश गायकवाड यांनी भाजप-शिवसेनेला आव्हान दिले आहे. महेश गायकवाड यांनाही रोखण्यात शिंदेसेनेला यश आलेले नाही. या बंडखोरीचा परिणामvकिती होईल याबाबत साशंकता असली तरी, शिंदे गटातील बंडखोरांमुळे महायुतीचा ताप मात्र वाढण्याची चिन्हे आहेत.
Discussion about this post