सारथी महाराष्ट्राचा.
(ता.प्र ):- शेख मोईन.
किनवट:संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाची विधानसभा निवडणूक ही विशेष ठरणार आहे. गेल्या दोन वर्षाचे फोडा फोडीचे खोके राजकारण बघता मतदारांमध्ये पूरता गोंधळ उडालेला दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून विद्यमान सरकार स्थापन झाले होते. विद्यमान सरकार स्थापन होताना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटी मोठ्या प्रमाणात झाली या फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका सर्वच मुख्य पक्षांना बसलेला दिसून येत आहे.आणि सर्वात महत्त्वाचे ही फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले दिसून येत नाही. यामुळे जनता निश्चित कौल कोणाच्या बाजूने देईल हे सांगता येणार नाही.
त्यातच मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण व धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला योग्य निर्णय घेता आलेला दिसून येत नाही. अशातच मराठा व ओबीसी संघर्ष पराकोटीला गेलेला दिसून येत आहे.याचाही फटका नेमका कोणाला बसेल हे निश्चित सांगता येणार नाही. एक मात्र खरं या सर्व गोंधळामुळे उभ्या ठाकलेल्या उमेदवारांची पुरती झोप उडालेली दिसतं आहे.आणि याला किनवट/माहूर मतदार संघ ही अपवाद नाही. या मतदार संघांमध्ये आदिवासी,बंजारा आणि इतर जात समूह त्यांचा पगडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसे पाहिले तर जात फॅक्टर नेहमीचं प्रभावी ठरताना दिसत आला आहे. विद्यमान आमदार मा.केराम हे आदिवासी समाजातुन येतात.भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी बहाल झाली आहे.तर आदिवासी बहुल मतदारसंघात तेवढाच ताकतीचा बंजारा समाज ही या मतदारसंघांमध्ये वास्तव्याला आहे. बंजारा समाजाचे तीन वेळचे आमदार प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांचाही जनसंपर्क दांडगा असल्यामुळे सहाजिकच आपल्या समाजाचा नेता आमदार व्हावा ही इच्छा सर्व स्तरातून बोलली जात आहे.
आता निवडणुका तोंडावर आल्या की प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळावी आणि मीच आमदार व्हावे अशी इच्छा असणारे डझनभर तरी इच्छुक असतात.आणि इथे तर महाविकास आघाडी असो की महायुती असो दोन्ही बाजूला तीन तीन पक्ष एकत्र उभे ठाकून निवडणुकीचा रणसंग्राम लढवत आहेत.आता एका पक्षाचे डझन भर इच्छुक असतात तर इथे तीन पक्षाचे उमेदवार गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले होते.प्रत्येकाला आमदारकीचे आणि लाल दिव्याचे स्वप्न पडत होती.आणि त्यातूनच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेचे जोतिबा खराटे हे इच्छुक होते.युती तुटेल आणि त्यांनाच त्यांचा पक्षाचे तिकीट मिळेल असे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते परंतु युती तुटली नसल्याने त्यांच्याही पदरी घोर निराशा पडली. तर भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून शिव संग्राम पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी दिली तरी भारतीय जनता पक्षामध्ये प्रफुल्ल राठोड, संध्याताई राठोड, सचिन नाईक, धरमसिंग राठोड या नेत्यांनाही उमेदवारीचे वेध लागले होते. परंतु यांच्या पदरी मागील वेळी प्रमाणे घोर निराशाच पडली. साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. प्रश्न इतक्यावरच थांबत नाही हे सर्व इच्छुक पक्षाच्या कार्यप्रणाली वर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच बंडाची शक्यता नाकारता येत नाही.आणि बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून सचिन नाईक यांनी दंड थोपटले आहेत. परंतु त्यांचा बंजारा समाजातील सुज्ञ जाणत्या लोकांनी हा भाजपचा पुरस्कृत उमेदवार असल्याची चर्चा सगळीकडे खुले आम् बोलून दाखवत असल्याने त्यांचा शिट्टीची हवा गुल झालेली दिसतं आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने डॉ.पुंडलिक आमले यांना उमेदवारी देऊन किनवट / माहूर मतदार संघामध्ये चुरस निर्माण केल्याचे बोलल्या जात आहे. डॉ.आमले हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांचा जन संपर्क सर्व समाजातील घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसतं आहे. एक तरुण तडफदार आदिवासी चेहरा म्हणून डॉ. आमले यांचा चेहरा सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून ओळखल्या जात आहे. त्याच गोष्टीची नोंद घेऊन वंचीत बहुजन आघाडीने डॉ. आमले यांना उमेदवारी देऊन किनवट/माहूर मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे काम केले आहे. डॉ. आमले यांच्याकडे तिसरा पर्याय म्हणून पाहिल्या जात आहे. यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे निश्चित झाले आहे. इच्छुकांच्या या मांदियाळी मध्ये जनता आपला कौल कोणाला देईल हे सांगणे आता तरी कठीण झाले आहे.
तरी किनवट/माहूर मतदार संघामध्ये महायुतीचे भीमराव केराम, महाविकास आघाडी तर्फे प्रदीप नाईक, वंचित बहुजन आघाडी तर्फे डॉ.पुंडलिक आमले यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने चुरशीची तिरंगी लढत होईल असे बोलले जात आहे. जनता कोणाला कौल देईल आणि विजयी करेल हे पाहणे
औत्सुक्याचे ठरेल..
Discussion about this post