याच पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत प्रचारार्थ जाहिर सभा संपन्न झाली.
या सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब, आ. शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख विजय परब साहेब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, उदयसिंह दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीपजी पवार, डॉ. जगदीशदादा पाटील, महाविकास आघाडीचे भुसावळचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार ॲड. धनंजय चौधरी आणि अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत उपस्थितांशी संवाद साधताना मी नमूद केले की, मागील निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला तरी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत सतत कार्यरत राहिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन, त्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली, निवेदने सादर केली आणि जनसंवाद यात्रा काढून समस्या जाणून घेण्याचा व त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांना विनंती केली की, याच सेवाभावनेचे बळ देण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.
निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याला प्राधान्य असेल. उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेऊन शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा, पर्यटन विकासातून उद्योग आणून तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी मार्गदर्शन करताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेब म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुतीचे सरकार असूनही त्यांनी जनतेच्या हितासाठी सत्ता वापरली नाही. यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, बेरोजगारी वाढली. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री योजना राबवणार आहे.
महालक्ष्मी योजनेअंतर्गत स्त्रियांना दरमहा तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास, कृषी समृद्धीसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान, हमीभावाचे आश्वासन, बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपये भत्ता, पंचवीस लाखांचा आरोग्य विमा, जातीनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा अशा उपाययोजना राबवणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानातून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाचे, तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बंधु-भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
रोहिणीताईखडसे
Discussion about this post