भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर – डहाणू पथकातील होमगार्ड कृष्णा नरेश गडग (रा. धानिवरी खडकीपाडा) यांचे 16 नोव्हेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने डहाणू पथकातील होमगार्ड कर्मचारी आणि अधिकारी यांनी एकत्र येत स्वतःच्या खिशातून ₹32,550 रक्कम गोळा करून त्यांच्या आई-वडिलांना आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केली.
या वेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून होमगार्ड पथकातील सहकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
होमगार्ड हे पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य निभावत असतात. परंतु, अपघात, दुखापत किंवा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही ठोस मदत मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत होमगार्ड सहकारी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करतात.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने अशा घटनांमध्ये होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक मदत निधी तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला पाहिजे. तसेच, होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
होमगार्ड हे पोलीस खात्यातील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या कल्याणासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात. अशा प्रसंगांमध्ये कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी शासनाने त्वरित योजना अमलात आणण्याची गरज आहे.
ही घटना शासनाच्या जबाबदारीवर प्रकाश टाकते आणि यापुढे होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करते.
Discussion about this post