लातूर/प्रतिनिधी
” वर्तमान स्थिती सामाजिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीची व जात-धर्मप्रवण होत आहे.सामाजिक अभिसरण गोठवले जात आहे पण सामाजिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही” असे प्रतिपादन रमेश हणमंते यांच्या पाच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी लातूर येथे केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर, परिवर्तनवादी साहित्य परिषद, लसाकम यांच्या संयुक्त विद्यमाने रमेश हनुमंते यांच्या ‘काळजाचे स्पंदन’, ‘देश जळत चालला’, ‘वादळाच्या उरात’, ‘जाणीव’, ‘धर्मवेड्या माणसांनो’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रकाशन सोहळा लातूर येथे भालचंद्र सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.रामकिशन समुखराव यांनी रमेश हणमंते यांच्या साहित्याचा परिचय करून देत वाचन संस्कृतीमुळेच समाज सुसंस्कृत होतो.वाचनाची गरज महत्वाची मानली.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. माधव गादेकर होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व लातूर शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयद्रथ जाधव व विलास सिंदगीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य व साहित्यिक धनंजय गुडसूरकर, मसापच्या लातूर शाखेचे सचिव प्रा.डा. दुष्यंत कटारे, कथाकार सतीश सुरवसे,राम यादव,लेखक रमेश हणमंते सौ मधुवंती हणमंते विचारपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना चंद्रकांत वानखेडे म्हणाले की, साहित्यिक,कलावंत हे देश घडविण्याचे कार्य करतात. माणसांना विधायक विचारांने पेटविण्याची ताकद कलावंतामध्ये असते.रमेश हणमंते यांचे साहित्य वर्तमानाच्या जाणिवांना अधोरेखित करून या व्यवस्थेचा खरा चेहरा समाजासमोर मांडते.कविता,कथा, वैचारिक लेखन हे हणमंते यांचे साहित्य खऱ्या ताकदीचे साहित्य आहे.धर्मवेड्या माणसांनो या वैचारिक लेखातून त्यांनी केलेली धर्म चिकित्सा वास्तव आणि मुलभूत आहे.सर्वसामान्य माणसांच्या वेदना, दुःख, असाह्यता ते ताकदीने मांडतात.
“काळजाचे स्पंदन” व “धर्मवेड्या माणसांनो” यावर भाष्य करताना डॉ जयद्रथ जाधव म्हणाले की, हणमंते यांच्या साहित्याचा आत्मा सामाजिकता हा आहे.समकालात सामाजिक जीवनाला कुंठीत केले जात आहे. साहित्यिक काळाच्या पुढे जाऊन दूरवरचे पाहतो.उद्याची स्थिती समजून तो साहित्यामधून समाजाला सावध करतो याप्रमाणेच रमेश हणमंते यांची कविता मानवी मूल्यांचे अधिष्ठान आहे,असे विचार मांडले.
प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे ‘जाणिव’ कथासंग्रहावर भाष्य करताना म्हणाले, ” रमेश हनमंते यांची कथा स्वानुभवातून आली आहे. वेदना, दुःख, स्री शोषण हे तिचे सूत्र आहे. साहित्य परिवर्तनाचे साधन आहे ही जाणीव यात असून सकारात्मक प्रबोधनाचा विचार ही कथा आवर्जून देते. सर्जनशील वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी ही कथा आहे. जाणीव मधील सुयोग्य पद्धतीने भाषेची केलेली निवड ही या कथेची उजवी बाजू आहे.”
यावेळी धनंजय गुडसुरकर म्हणाले की,लेखन आणि वर्तन याचा समन्वय हणमंते यांच्या साहित्यातून व वर्तनातून प्रतिबिंबित होतो. त्यामुळे त्यांच्या अक्षरांना असणारे महत्त्व वेगळे आहे. सरळ साध्या शब्दांतून हा कवी मानवी प्रतिष्ठेचा विचार देतो. म्हणून या कवितेकडे मानवी मूल्यांची कविता म्हणून पाहिले पाहिजे असे गुडसूरकर यांनी प्रतिपादन केले.विलास सिंदगीकर यांनी साहित्यिकाच्या भूमिकेबाबत मांडणी केली.साहित्य जातीधर्माच्या पलिकडे मानवी मूल्यांची पेरणी करते.लेखक हा समाजाला समजून घेतो.आणि वाचतो तसेच वाचकांनी त्या लेखकांचे साहित्य वाचले पाहिजे. रमेश हणमंते निर्भयपणे लिहिणारे लेखक आहेत.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ.माधव गादेकर यांनी माणसाची अवहेलना संपत नाही त्या जगण्याला काय अर्थ आहे असा प्रश्न उपस्थित केला. संवेदना जागे करण्याचे काम साहित्य करते, हणमंते यांच्या शब्दातली ऊर्जा संवेदना जागी करणारी आहे.यावेळी कथाकार सतीश सुरवसे, समीक्षक रामभाऊ यादव यांनी ही मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळ्याला योगीराज माने, पांडुरंग अडसुळे, रामराजे आत्राम, अनंत लांडगे,नरसिंग इंगळे,डॉ.भगवान वाघमारे, डॉ.शिवाजी जवळगेकर, श्री अभंगे सर,मोहन कांबळे,शैलजा कारंडे,उषा भोसले, तहसील सय्यद, सुलक्षणा सोनवणे, ऋचा पत्की,सौ.वंदनाताई गादेकर,दिलीप गायकवाड, विक्रम पाटील,प्रताप माने पाटील, श्रीमंत पाटील,राजेंद्र माळी, पत्रकार बाळ होळीकर, ॲड हाशम पटेल, प्रदीप कांबळे साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते.
दयानंद कांबळे यांनी सूत्रसंचालन तर बालाजी साळुंखे यांनी आभार मानले.
कवी रमेश हणमंते
व
मसाप शाखा लातूर,
परिवर्तन विचार मंच व लसाकम लातूर
Discussion about this post