मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. झालेल्या परतीच्या पावसाचा फायदा तालुक्यातील तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र, पाऊस उघडल्यानंतर सकाळच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे तूर पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून, या धोक्यामुळे तूर पिकाची फूलगळ व पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने परिसरातील शेकडो हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे . या रोगापासून तूर पिक वाचविण्यासाठी शेतकरी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. सध्या तूर पिकावर पडत असलेल्या धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूर उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. तूर पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांच्या आशा, अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गासमोर या रोगाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक किटकनाशकाची फवारणी खर्च वाढला आहे.

परतीच्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता, यामुळे तूर पिकावर मर रोगाचाही प्रादुर्भाव होत आहे. यामुळे तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने या निसर्गाच्या बदलाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याने परिसरातील शेतकरी तूर या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे; परंतु यावरही वातावरणाच्या बदलाचा मोठा परिणाम जाणवत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या धुक्यामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे तूर पिक उद्ध्वस्त होऊ होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
Discussion about this post