धर्माबाद प्रतिनिधी चैतन्य घाटे
परभणी शहरातील मोक्याच्या ठिकाणी अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय तथा रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विश्वरत्न,महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली असून याचे आता राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटने नंतर परभणी शहरात आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष पसरला असून त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी समाज एकवटला आहे. त्याच धर्तीवर आता राज्यभर निषेधाची लाट उसळली असून उपरोक्त घटने च्या निषेधार्थ आज (१२ डिसेंबर) धर्माबाद बंदची हाक आंबेडकरी अनुयायांकडून देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी परभणी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली त्याचा निषेध सबंध राज्यभरातून होत असून त्याच पार्श्वभूमीवर १२ डिसेंबर रोजी धर्माबाद शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला व्यापारी बांधवांनी बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. वरील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुले नगर येथे मोर्चाची सुरुवात होणार आहे तर पुढे बसवण्णा हिल्स, रामनगर चौक,महर्षी वाल्मिकी चौक, आंध्रा बसस्थानक,नरेंद्र चौक,नेहरू चौक,पोलीस ठाणे ,पानसरे चौक, मोंढा रोड व छ.शिवाजी महाराज चौक येथून पुढे जात तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन सांगता होणार आहे. यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, यासोबतच आंबेडकरी अनुयायांचा मोर्चात सहभाग असणार आहे.
Discussion about this post