खारपाडा, पेण – रायगड जिल्हा परिषद शाळा बळवली येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले, ज्यात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा या शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केंद्र प्रमुख माननीय श्री. मुकुंद पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्पर्धेत खारपाडा शाळेने सलग दुसऱ्या वर्षी उच्च स्थानावर आपले नाव कायम ठेवले आहे.
या वर्षी खेळवण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये लंगडी, लगोरी, बेचकीने नेम धरणे, दोरी उडी व लगोरी हा नवा खेळ समाविष्ट केला होता. खारपाडा शाळेने मोठ्या गट (इयत्ता ५ वी ते ८ वी) आणि लहान गट (इयत्ता १ ली ते ५ वी) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
मोठा गट (इयत्ता ५ वी ते ८ वी):
- लंगडी – प्रथम क्रमांक
- बेचकीने नेम धरणे – प्रथम क्रमांक
- दोरी उडी – द्वितीय क्रमांक
- लगोरी – द्वितीय क्रमांक
लहान गट (इयत्ता १ ली ते ५ वी):
- लगोरी – प्रथम क्रमांक
- लंगडी – द्वितीय क्रमांक
- दोरी उडी – द्वितीय क्रमांक
शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेतून आणि कौशल्यातून हे यश मिळवले आहे. यापूर्वी शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्रमांक २ मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता आणि रुपये पाच लाखाचे बक्षीस मिळवले होते.
तसेच, जिल्हा परिषद रायगड शिक्षण विभागाने शाळेतील इयत्ता ६ वी ते ८ वी वयोगटातील ६ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपशिक्षिका सौ. नंदिनी कदम यांना नेमणूक दिली आहे.
शाळेचे मार्गदर्शक श्री प्रविण लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सहशिक्षक व शिक्षिका – सौ. नंदिनी कदम, श्री. दिनकर पाटील, सौ. ज्योती पाटील, सौ. संगीता पाटील, सौ. सुरेखा रुपनर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
शाळेच्या उत्तम कामगिरीबद्दल समाजसेवक व महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post