दिंद्रुड दि.19 (प्रतिनिधी):- येथील तरुण ग्रा.पं. सदस्य अतुल चव्हाण यांनी अथक मेहनत करून स्वखर्चाने नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. याची दखल रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल यांनी घेतली असून चव्हाण यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. रोटरीने केलेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखीच वाढली असल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
माजलगाव येथील फ्लाईंग बर्डस ॲकॅडमी च्या निसर्गरम्य प्रांगणात हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव, कृषिभूषण व जलदुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर रोटरीचे उप प्रांतपाल डॉ.शंकर जुजगर, सुधीर लातुरे, नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग चांडक, सचिव प्रभाकर शेटे, सुनील शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.प्रकाश आनंदगावकर, शंकर मुठाळ, आण्णासाहेब जाधव, भागवत मोरे, प्रकाश जाधव, अतुल चव्हाण यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आले. यावेळी डॉ.संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंद वाटा या विषयावर बहारदार व्याख्यान झाले.
गतवर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. जानेवारी महिन्यापासूनच नळाला येणारे पाणी बंद झाल्याने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडच्या नागरिकांचे हाल झाले. मात्र अतुल चव्हाण या तरुणाने तब्बल दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून बोरवेल्स, विहिरी मध्ये पाईपलाईन गावात पाणी आणले. जवळपास बारा ठिकाणी 1000 लिटरच्या पाणी टाक्यांमध्ये पाणीसाठा सुरू केला. पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरात लागणाऱ्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली. चव्हाण यांच्या या कार्याची दखल रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. दिंद्रूडच्या भूमिपुत्राचा सन्मान झाल्याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
चौकट ••••••••••••••••••••••••••
पाणी टंचाई असल्यास मध्यमवर्गीय व श्रीमंत लोक उन्हाळ्यात पाणी विकत घेतात. परंतु गोरगरीब जनतेने दररोज हजार पाचशे रुपये आणायचे कुठून? हा मोठा प्रश्न आहे. खास करून महिलांना पाण्यासाठी रात्री अपरात्री वणवण करावे लागत होते. महिलांचे हाल थांबविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाची दखल घेतल्याबद्दल रोटरीचे मनापासून आभार मानतो.
– अतुल चव्हाण
Discussion about this post