माणुसकीचे दर्शन घडवत स्वतः दवाखान्यात केले दाखल
प्रतिनिधी:- सिद्धेश्वर पवार
परभणी – गंगाखेड महामार्गावर ताडपांगरी फाट्याच्या जवळ एक तरुण हृदय विकाराचा झटका अथवा फिट्स आल्याने गाडीवरून खाली पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या परभणी महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी कार्डियाक मसाज करून तरुणाला तात्काळ स्वतः सहकाऱ्यांच्या मदतीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने जीवनदान मिळाले. एका महिला पोलिस अधिकाऱ्याने दाखविलेल्या प्रसंगअवधानामुळे खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले.
सदर घटनेविषयी अधिक माहिती अशी की, परभणी महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना वैजनाथ करपुडे परभणी-गंगाखेड महामार्गावर गुरुवार 2 जानेवारी रोजी पोखर्णी वरून परभणीकडे साधारणतः सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जात होत्या. त्यावेळी ताडपांगरी फाट्याजवळ आल्यानंतर त्यांना एक तरुण ज्याचे नाव सोपान सुर्यवंशी गाडीवरून अचानक फिट्स किंवा हृदयविकाराचा झटका येऊन बेशुध्द अवस्थेत खाली पडल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यांनी तात्काळ त्या तरुणास रस्त्याच्या बाजूला घेऊन छातीवर कार्डियाक मसाज केली. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या युवकाचे बंद पडलेले हृदय पुन्हा मसाज केल्याने सुरू झाले आणि तो शुद्धीवर आला. त्यानंतर ताबडतोब करपुडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस सहकाऱ्यांनी त्या युवकास परभणी शहरातील अनन्या हॉस्पिटलमध्ये स्वतः घेऊन जात दाखल केले. डॉक्टरांनी सदर रुग्णाची तपासणी करून योग्य ते उपचार सुरू केले.
महिला पोलिस अधिकाऱ्यानी सोपान सूर्यवंशी यास कार्डियाक मसाज करून वेळेवर रुग्णालयात पोहोचविल्याने त्याला जीवनदान मिळाले. या घटनेत महिला पोलिसांचे कर्तव्य बजावत असताना खाकी वर्दीतील माणुसकीचेही दर्शन घडल्याने परभणी महामार्ग पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
Discussion about this post