अहिल्यानगर :प्रतिनिधी
अहिल्यानगर / कोपरगाव प्रशांत टेके पाटील — संजीवनी फार्मसी महाविद्यालय औषध निर्माण कार्यात नेहमी भाग घेते. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आरजीएसटीसी) कडे मॅग्नेटिक लिपोझोमल एरोसोल (एमएलए) ऑफ इटोपोसाईड या लंग कॅन्सर उपचारासाठी परिणामकारक व सर्वसामान्यांना परवडेल अशा औषधाचा संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्यास आरजीएसटीसीने विविध निकषांच्या आधारे पडताळणी करून मान्यता दिली. या संशोधन कार्यास २६.५४ लाखांचा निधी मंजूर केला.
राज्यातील नामांकित फार्मसी संस्थांनी एकूण ५४ संशोधन प्रकल्प आरजीएसटीसीकडे सादर केले होते. यात संजीवनीसह ५ ऑटोनॉमस संस्थांचा समावेश होता. त्यात संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा प्रकल्प मंजूर झाला. संजीवनी ग्रामीण भागात असूनही संशोधन कार्यात पुढे आहे. संशोधन कार्य महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल हे प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर (मुख्य अन्वेषक) म्हणून काम करणार आहे. प्रा. सुप्रिया भागवत यासह अन्वेषक म्हणून कार्य करणार आहे.
अमित कोल्हे म्हणाले, नावीन्यपूर्ण कल्पना, संशोधन क्षमता, औषधाची उपयुक्तता आणि किफायत मुल्य, औषध निर्माण शास्त्रातील पदव्युतर पदवी व पीएचडीच्या संशोधन प्रकल्पांचा दर्जा आदी बाबींचा आरजीएसटीसीने परवानगी बाबत विचार केला. यापूर्वी महाविद्यालयाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद, नवी दिल्ली, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, बायोटेक्नॉलॉजी विभाग, भारत सरकार, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी पूर्वी दिलेल्या निधीचा व संबंधित संशोधन प्रकल्प पूर्ण केल्याचे अहवालही विचारात घेतले. संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला भारत सरकारच्या डिपार्टमेन्ट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे संशोधन आणि सल्लागार ही कामे करण्याचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे महाविद्यालयास ३ वर्षांच्या संशोधन कार्यास २६.५४ लाखांचा निधी मंजूर केला. संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी डॉ. विपुल पटेल यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post