खडकवासला प्रतिनिधी
शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या एकत्रित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि रहिवाशांच्या हितासाठी सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून परिसरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा, वाहतूक समस्या, रस्त्यांची दुरावस्था, पार्किंगच्या समस्या आदी विषयांवर एकत्रितपणे काम केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी सोसायटी महासंघाच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महासंघाच्या अध्यक्षपदी नवनाथ नलावडे, उपाध्यक्षपदी राकेश सर्जेराव, सचिव प्रविण लांडगे, कार्याध्यक्षपदी सुनिल वरघुडे यांना बहुमताने नियुक्त करण्यात आले आहे. कार्यकारणी मध्ये सदस्यपदी सलिम शेख, धनंजय दंडवते, प्रशांत देशमुख, तुळशीदास नांदगावकर, अशोक मोरे, सतीश पटवारी, गंगाधर कुऱ्हाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. परिसरातील वेगवेगळ्या सोसायटी मधून सामाजिक कार्याची आवड असलेले सदस्य यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्रसंगी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, अनेक सोसायट्यांना समान समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी हा महासंघ महत्त्वाची भूमिका बजावेल. परिसरातील सोसायटी मधील सर्व नागरिकांनी या महासंघाच्या स्थापनेचे स्वागत केले असून, भविष्यात सर्व सोसायट्यांना एकत्र आणून प्रशासना सोबत समन्वय साधण्याचा सोसायटी महासंघाचा मानस आहे.
Discussion about this post