कुनघाडा रै येथे ग्रामसचिवालय इमारत मंजूर
पाच महिन्याचा कालावधी लोटूनही बांधकाम कागदावरच..
चामोर्शी,
तालुक्यातील कुनघाडा रै येथे अंदाजित किंमतीनुसर ४२९५५४५ एवढ्या रक्कमेची तरतूद करून ग्रामसचिवालय इमारत मंजूर करण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामाचा कालावधी ९ महिन्याचा आहे मात्र पाच महिने लोटूनही कामाचा श्रीगणेशा झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी बांधकाम कागदावरच दिसून येत आहे.
चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै हे गाव लोकसंख्येने व विस्ताराने बरेच मोठे असून, राजकीय दृष्ट्याही महत्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. अवतीभोवती असलेल्या खेड्यांचे एक केंद्रबिंदू आहे.

गावाची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेऊन गावाच्या विकासात्मक कामासाठी ग्रामसचिवालय इमारतीस मंजुरी प्रदान करण्यात आली. सदर कामाची अंदाजित किंमत ४२९५५४५ एवढी आहे. मंजूरीचे दर ५० टक्के कमी दर प्रमाणे आहे. निविदा स्वीकृत किंमत ४२७४०६७ , इतर कर ४९०९८ , १८ टक्के जीएसटी प्रमाणे ७६९३३२, करारनामा एकूण किंमत ५०९२४९७ एवढी आहे. कामाकरीता सादर केलेली निविदा सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर करण्यात आली असून सुरक्षा रक्कम, परफॉर्मन्स सिक्युरिटी सूट नुसार भरणा केलेली आहे.
ग्रामसचिवालय इमारतीमध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार चालविला जाणार असून, गावातील लहानमोठे कार्यालय , संगणक कार्यालय, सभेसाठी हाल, खाली चाळीचे बांधकाम होऊन भाड्याने दुकान गाळे सुध्दा चालविले जात असतात.
बांधकामास ८ जानेवारी २०२४ ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी ९ महिन्याचा तर दोष निवारण कालावधी १० वर्षाचा आहे. वर्क ऑर्डर नियमानुसार १५ मार्च २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश आहेत.
नमूद केलेल्या मुद्दतीत काम पूर्ण न झाल्यास करारणाम्याच्या कलम २ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार दंडात्मक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सदर काम सध्यातरी कागदावराच दिसून येत आहे.
जिल्हा परिषदच्या एका अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या एका जागेची ग्रामसचिवालय इमारतीच्या बांधकामासाठी निवड करण्यात आली होती. मात्र जागेत दोष दिसून आल्यामुळे सदर जागा रद्द करण्यात आली आहे.
जागेच्या मुद्यावर गाजली ग्रामसभा स्वातंत्र्य दिनानिमित्त २२ ऑगस्ट रोजी किसन स्थानिक किसान भवण येथे सरपंचा अल्का धोडरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयावर ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र ग्रामसचिवालय इमारतीच्या जागा निच्छितीवर ग्रामसभेत चांगलीच खडाजंगी माजली. ज्या जागेवर ग्रामपंचायत आहे त्याच जागेवर ग्रामसचिवालयची इमारत बांधण्यात यावी असे ग्रामसभेने ठरविले आहे.
अखेर ग्रामपंचायतच्या जागेवरच ग्रामसचिवालय इमारतीचे बांधकाम करण्यात येईल असा ठराव ग्रामसभेने पारित केला आहे. सभेला उपसरपंच अनिल कुनघाडकर, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, तमुस अध्यक्ष भाऊजी कुकडे , ग्रा प सदस्य वैभव दुधबळे, माजी सरपंच अविनाश चलाख, ग्रामविकास अधिकारी रवींद्र कुनघाडकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post