आष्टी (प्रतिनिधी)
आधी डीपी मिळवण्यासाठी अर्ज मग त्यासाठी अनेक हेलपाटे , डीपी ऐवजी सोलर पंप देऊ असा सल्ला आणि एवढे करूनही प्रत्यक्षात वीज महावितरणने मात्र त्याच शेतकऱ्याचा ग्राहक क्रमांक वापरून भलत्यालाच व्यक्तीला सोलार पंप मंजूर करण्याचा पराक्रम महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र संबंधित शेतकऱ्याने हताश न होता पाठपुरावा केल्यामुळे वीज महावितरण कंपनीचे अखेर पितळ उघडे पडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकरी अशोक सयाजी गोल्हार यांनी विज महावितरण कंपनीकडे शेतीसाठी एक शेतकरी एक डी पी योजनेतून स्वतंत्र डीपीची मागणी केली होती. त्यासाठी रीतसर पैसेही भरले होते. मात्र तीन वर्षापासून महावितरण कार्यालयात हेलपाटे मारूनही त्यांना डिपी काही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बीड येथील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तेथील अधिकाऱ्यांनी आता डी पी ऐवजी सोलर पंप देऊ, त्यासाठी तुम्ही बीड येथील मेडा या कार्यालयात जाऊन अर्ज करण्याचा सल्ला दिला.
तेथे अर्ज केला असता गोल्हार यांना तुम्ही अर्ज केलेल्या ग्राहक क्रमांकावर आधीच सोलर पंप देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतके दिवस डीपीसाठी आणि नंतर सोलार साठी प्रयत्न करणाऱ्या गोल्हार यांना हा मोठा धक्काच होता. त्यांनी मग माहिती अधिकाराचा वापर करून त्यांच्या ग्राहक क्रमांकाने मंजूर सोलार पंप कोणाला गेलाय याचा शोध घेतला. अगोदर माहिती अधिकारालाही दाद न देणाऱ्या महावितरणने गोल्हार हे अपिलात गेल्यावर मात्र तात्काळ संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि त्याचा आणि त्याच्या शेतीचा सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे याची माहिती दिली.
त्यामुळे गुरुवारी आष्टी येथील महावितरण कार्यालयासमोर अशोक गोल्हार यांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकाचा वापर करणारा शेतकरी भानुदास कवडे रा. शिरापूर आणि त्याला सहकार्य करणारे महावितरण कर्मचारी तसेच सोलार कंपनीचा साईट इंजिनियर यांच्यावर कारवाई व्हावी आणि गोल्हार यांनाच मंजूर असलेला सोलार पंप तात्काळ बसवण्यात यावा यासाठी उपोषण केले.त्यांच्या उपोषणानंतर महावितरण अधिकाऱ्यांना जाग आली. आणि त्या प्रकरणी वीज महावितरणने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी गोल्हार यांनी उपोषण मागे घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post