प्राथमिक शाळा बनल्या विना लिपिक शासनाच्या विविध उपक्रमाचे माहिती केंद्र ,जिल्ह्यासह राज्याची स्थिती
मोहोळ तालुका /प्रतिनिधी -बापू घळके -शासनाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व नगरपालिका,महानगरपालिका शाळांमध्ये राबविले जाणारे विविध उपक्रमच उदंड होत असून यामुळे शिक्षकांना अध्यापन ,तर विद्यार्थ्यांना अध्ययनापासून दूर ठेवले जात आहे.त्यामुळे प्राथमिक शाळांतील शिक्षकांना विनालिपिक माहिती संकलनाचे केंद्रे बनविण्याचा घाट घातला जात आहे.
उदंड झालेल्या उपक्रमांमुळे शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.सरकारी शाळा म्हणजे प्रत्येक बदलणाऱ्या सरकारच्या धोरणाची प्रचारस्थळे बनली आहेत.सरकारचे चेहरे पाठ्यपुस्तकांमधून डोकावायला लागले आहेत. शिक्षकांना राष्ट्रीय कामांच्या नावाखाली जनगणना,
पशुगणना, मतदार नोंद, मतदार शोध,दारिद्रयरेषेखालचे लाभार्थी शोध,आर्थिकस्तर निर्धारक अशा जबाबदाऱ्या त्यांच्या गळ्यात येऊन पडल्या आहेत.आणि बिचारे शिक्षक विनातक्रार,जबबदारीने आणि बिनचूक माहिती संकलक आणि अंक विश्लेषक म्हणून काम करत आहेत.आता तर कोणत्याही मंत्र्यांनी आपापल्या खात्याच्या प्रचारासाठी शाळा या हक्काच्या यंत्रणा म्हणून वापरायला सुरवात केली आहे.
जसे की आरोग्य विभाग,महसूल विभागाचे विविध उपकम, वनखात्याची झाडे लावण्यासाठी प्रभातफेरी काढा शाळेतच,प्रति विद्यार्थी झाडे लावा, त्याचे फोटो पाठवा. त्याचा गावात प्रचार करा.आरोग्य विभागाच्या लोहयुक्त गोळ्या वाटा,सॅनिटरी नॅपकिन द्या,जंत मुक्तीचा प्रचार आणि प्रसार शाळांनीच करावा यासाठी अट्टाहास करण्याचा नियमच झाला आहे.यासाठी मुलांसोबत शिक्षकांना वेठीस धरले जात आहे.
शालेयपोषण आहाराची आहार शिजविण्याव्यतिरिक्त शालेय पोषण माल उतरून घ्या.माल देण्यासाठी पुरवठागाडी केंव्हा का येईना शाळेत हजर राहा,ग्रॅम ,मिली मध्ये नोंद ठेवा,मालाचा पुरवठा लवकर झाला नाही ,तर पदरने विकत आणा,स्वच्छता ठेवा,झाडून काढा,भांडी स्वच्छता पाहा अशा एक ना अनेक सगळ्या जबाबदाऱ्या शिक्षकांच्या माथी आणि त्या पण कसलीही तक्रार न करता मुख्याध्यापक आणि शिक्षक बिनबोभाट पार पाडताहेत.त्यात प्रत्येक वरिष्ठ अधिकारी शिक्षण खात्यात बदली होताच स्वतःला चाणक्य समजून घ्यायला लागले आहेत.अगोदरच शासनाचे उपक्रम राबवून कंटाळलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हे नवीन आलेले अधिकारी परत स्वतःचे कार्यक्रम आखतात, त्यांची नवीन धोरणे आखली जातात.
जिथं विद्यार्थी आणि शाळांना मुलभूत सुविधांचा अभाव आहे तिथं हे अधिकारी कुठल्या तरी खासगी संस्थेच्या सर्वेक्षणावरून मुलांचे स्तर ठरवतात, वर्गवारी करतात आणि आपणाला हवे तसे रिझल्ट मिळावेत म्हणून सगळी व्यवस्थाच कामाला लावतात.शासनाचे उपक्रम अधिक नवीन अधिकाऱ्यांचे नवीन उपक्रम ज्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना बढती आणि शाबासकी या सगळ्यासाठी मग दिवसा-आठवड्या गणिक प्रगती आणि वर्गवारीच्या माहितीचे कागदी घोडे नाचवले जातात.कहर म्हणजे ऑफ लाईन बरोबर ऑनलाईन माहिती भरण्याचे फर्मान निघते. मग सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले मुख्याध्यापक आणि शाळेतील सर्व शिक्षक माहिती वेळेत भरण्यासाठी नेटकॅफेच्या दारात हेलपाटे मारतात आणि सुरू होतो ऑनलाईन आणि ऑफ लाईनचा खेळ.अविरत वर्षभर आज,आता, ताबडतोब अशी रेस सुरू होते.आणि गुरुजी या जंजाळात अडकत जातात. तासन् तास वर्ग मॉनिटरच्या हवाली करून उभे आणि आडवे तक्ते आखत रकानेच्या रकाने भरत राहतात.काही जिल्ह्यात हजारो तर काही जिल्ह्यात शेकडो शिक्षकांची पदे रिक्त आहेत.सगळीच्या सगळी यंत्रणा माहिती संकलनात व्यस्त आहे.
शिक्षणाधिकारी पद रिक्त तिथे कुणीतरी
उपशिक्षणाधिकारी काम करतात.त्यांचे काम विस्ताराधिकारी सांभाळतात.गटशिक्षणाधिकारी नाहीत म्हणून विस्ताराधिकारी काम पाहतात. त्यांची पदे रिक्त म्हणून केंद्र प्रमुख काम पाहातात. केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांवर शिक्षकांमधील पदवीधर शिक्षक काम करतात.समन्वयक व केंद्रीय मुख्याध्यापक काम करताहेत.केंद्रीय मुख्याध्यापकां चे काम शाळेतील ज्येष्ठ किंवा पदवीधर शिक्षक करतात.आणि गुरुजीं मात्र या कामांमुळे मुलांची फारकत होऊन ते घरे आखण्यात आणि माहिती भरण्याचं काम सांभाळत आहेत.
चौकट :
आमचे अध्यापनाचे काम आम्हाला करू द्या, विद्यार्थ्यांना शिकवू द्या : –
“शिक्षकांना सातत्याने माहिती संकलन,नोंदी आणि सांख्यिकी विश्लेषणात गुंतविल्याने शिक्षक-
व विद्यार्थी यांच्यातील अंतर वाढत चालले असून
शिक्षणाचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे.यातूनच आम्हाला शिकवू द्या.अशी आर्त हाक शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या माध्यमातून येत आहे.मात्र स्वतःची पाठ थोपटून घेणारे शासन ,प्रशासन आणि अधिकारी ती ऐकून न ऐकल्याचे करत आपलेच घोडे पुढे दामटत आहेत.”
Discussion about this post