दिनेश वानेरे, अक्षय वानखडे, सूरज थोरात यांचे सुयश
अमरावती तालुका प्रतिनिधी:
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी दिनेश मनोहर वानेरे, अक्षय ज्ञानेश्वर वानखडे, सूरज शंकरराव थोरात यांनी दि. ७ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता गाठलेली आहे. वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट परीक्षेत पात्र ठरणे आवश्यक असल्याने त्यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अक्षय वानखडे व सूरज थोरात या विद्यार्थ्यांनी नुकताच एम. ए. (राज्यशास्त्र) हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून एम. ए. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात असतानाच सेट ही परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. दिनेश वानेरे या विद्यार्थ्याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत सातवे स्थान पटकावले होते तसेच त्याने महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन कालावधीतील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात यशस्वीरितीने सहभाग घेतला होता. हे तीनही विद्यार्थी ग्रामीण भागातून आले असून आपल्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत त्यांनी यश संपादन केले आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून प्रशासकीय अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील तसेच विभागातील गुरुजन व मित्रमंडळींना दिले आहे. राज्यशास्त्र विभागात त्यांना अंशदायी शिक्षक महेंद्र भगत, रोहिणी गायधने, डॉ. सपना रोघे, डॉ. गजानन ढवळी, हर्षवर्धन रोटे, शीतल रोकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राज्यशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. प्रणव कोलते यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Discussion about this post