वरवंड येथे अकरा लाख रुपयांपेक्षा अधिक प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू यवत पोलिसांनी छापा टाकून पकडला. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या वरवंड येथे दि.१५ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रेवणनाथ हरिभाऊ गोसावी (रा. वरवंड, ता. दौंड) याचेविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार रवींद्र रामदास गोसावी यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून वरवंड गावचे हद्दीत रेवणनाथ गोसावी याच्या घरासमोरील बंद खोलीमध्ये बेकायदेशीर अवैधरित्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीकरिता ठेवलेला असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला असून त्या खोलीची झडती घेण्यात आली असता तेथे गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला.
या छाप्यात ११ लाख २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा माल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे, महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे यांनी केली असून या घटनेचा पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत
Discussion about this post