मलकापुर येथील पार्वतीसुत भक्त गणेश मंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू अशा बारा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.गणेश मंडळांच्या स्थापनेला १२५ वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने वर्षभरात १२५ सायकलींचे वाटप करण्याचा संकल्प मंडळांच्या वतीने करण्यात आला.
समाजाचे एकत्रीकरण करून स्वातंत्र्यलढ्यात उपयोग करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहुर्तमेढ रोवली.टिळकांच्या या संकल्पनेने प्रेरित होऊन मलकापूर शहरातील दुर्गानगर भागातील तत्कालीन नागरिकांनी पुढाकार घेऊन पार्वतीसुत भक्त गणेश मंडळाची स्थापना केली.मंडळाच्या स्थापनेपासूनच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली होती. १२५ वर्षांपासून संस्थापकांचा वारसा जपत मंडळातर्फे निरंतर गणरायाची स्थापना करण्यात येऊन उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो.
सामाजिक दायित्व जोपासण्याच्या उदात्त हेतूने मंडळांच्या कार्यकारी मंडळामार्फत मलकापूर परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक दामोदर लखाणी, सहसंचालक राजेश महाजन,माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी, उद्योजक मनिष लखाणी, माजी नगरसेवक सुहास चवरे, पत्रकार विरसिंह राजपुत व मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अंमलदार दिपक नाफडे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.मान्यवरांच्या हस्ते महाआरती करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर गणरायाच्या जयघोषात गरजु विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

Discussion about this post