पनवेल/ कामोठे(ता. प्रतिनिधी):-(श्रीनाथ (गणेश) लाड)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कामोठे शहराच्या एन्ट्री पॉइंटवर महाराजांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी कामोठेतील विविध शिवप्रेमी संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येत पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा.श्री.नितीन पाटील साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या प्रस्तावित स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा, आकर्षक प्रवेशद्वार, महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारी भित्तीचित्रे, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, शिवचरित्रावर आधारित साहित्य, प्रशस्त उद्यान, कारंजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच आधुनिक लेझर लाईट्स यांचा समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या स्मारकाच्या माध्यमातून कामोठे शहराची ऐतिहासिक ओळख अधिक दृढ होऊन भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला



