परतूरचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या अकस्मित निधनाची बातमी समजताच मन सुन्न झाले. राजकारणात अनेक नेते येतात, जातात; काही पदांमुळे लक्षात राहतात, तर काही त्यांच्या कामामुळे. पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी “माणूस” म्हणून लोकांच्या मनात कायमची घर करून राहतात. सुरेशकुमारजी हे त्यापैकीच एक होते.
पत्रकार म्हणून अनेक राजकीय व्यक्तींशी संपर्क येतो. अनेकांचे भाषण ऐकण्याची, कामे पाहण्याची संधी मिळते. मात्र सुरेशकुमार जेथलिया यांच्यातील वेगळेपण हे त्यांच्या साधेपणात आणि लोकांप्रती असलेल्या आत्मीयतेत होते. कोणताही माणूस भेटला तरी त्याला आपलेसे करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. चेहऱ्यावर कायम असलेले स्मित, बोलण्यातला संयम आणि समोरच्याला दिलासा देणारी शैली यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना औपचारिकतेची भिंत कधीच जाणवत नसे.
राजकारणात असताना त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला; पण त्या मदतीचा गाजावाजा कधी केला नाही. एखाद्या गरजू विद्यार्थ्याची फी असो, रुग्णाच्या उपचारासाठी धावपळ असो किंवा एखाद्या कुटुंबाच्या अडचणीच्या काळात आधार देणे असो — त्यांनी मदत ही केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नाही, तर माणुसकीच्या नात्याने केली. म्हणूनच त्यांच्या जाण्याने अनेकांचा आधारवड हरपला आहे.
पत्रकार म्हणून माझ्यासाठी त्यांच्याविषयी लिहिणे हे केवळ औपचारिक श्रद्धांजली वाहणे नाही; तर एका संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या सामाजिक योगदानाची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारिता ही केवळ घटनांची नोंद ठेवण्यापुरती मर्यादित नसून समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचे कार्य पुढे आणण्याची जबाबदारीही पार पाडते. सुरेशकुमार जेथलिया यांच्यासारख्या लोकाभिमुख नेत्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जपणे, हा त्या जबाबदारीचाच एक भाग आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि अनेकदा कटू होत चाललेल्या सार्वजनिक जीवनात त्यांनी जपलेली माणुसकी, संवादातील सौजन्य आणि सकारात्मकता विशेष महत्त्वाची वाटते. मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत, ही त्यांची भूमिका अनेकांना शिकवण देणारी होती.
त्यांच्या निधनाने परतूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. मात्र त्यांनी जपलेली माणसे, त्यांनी दिलेला आधार आणि त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील.








