मोहाळा गावातील पहिली महिला पोलीस; जालना पोलीस दलात निवड
प्रतिनिधी
पोंभूर्णा : तालुक्यातील मोहाळा येथील कु. चैताली संजय पोतराजे हिने पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत जालना पोलीस दलात निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण मोहाळा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकरी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मोहाळा गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान चैताली पोतराजे हिने मिळवला असून, हे यश गावासाठी अभिमानास्पद मानले जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
चैताली हिच्या यशाबद्दल दौलत आत्राम, वर्षा आत्राम (विदर्भ संघटिका, आदिवासी टायगर सेना), सुजाता कारेकर (उपसरपंच, मोहाळा), कुंदन पेंदोर (कराटे मास्टर, खराडपेठ), शारदा पिदुरकर आणि रवीना मडावी यांनी अभिनंदन करून पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, चैतालीचे यश हे केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे गावातील युवक-युवतींना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
पोलीस दलात कार्यरत राहून चैताली पोतराजे हिने प्रामाणिकपणे समाजसेवा करावी आणि गावाचे नाव आणखी उज्ज्वल करावे, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.











