
कोणसरी | प्रतिनिधी
कोणसरी येथील Lloyds Metals स्टील प्लांटजवळ बुधवारी (दि. २२ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पवनकुमार पाथर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, Lloyds Metals च्या ट्रकची धडक लागल्याचा आरोप करण्यात येत असून, अपघातानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दुचाकी रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळून आली. उपस्थित सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे घटनेबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यानंतर ते घटनास्थळावरून निघून गेल्याचेही सांगण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्लांट परिसरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.


