खारपाडा (पेण) | प्रतिनिधी :
रायगड जिल्हा परिषद शाळा, विंधणे येथील विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उरण तालुक्यात शाळेचा लौकिक उंचावला आहे.
इयत्ता दुसरीतील आर्या प्रीतम पाटील हिने उरण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता तिसरीमध्ये विंधणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिले तीनही क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये तेजस्विनी शैलेश नवाळे हिने प्रथम, चैतन्य भगवान पाटील याने द्वितीय, तर आर्या संदीप पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे प्रोत्साहन तसेच शाळेच्या शिक्षिका रंजना कोळी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश संपादन झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच रंजना कोळी मॅडम यांचे अभिनंदन केले.







