अहिल्यानगर जिल्ह्यातील व पारनेर तालुक्यातील गारखिंडी या छोट्याशा खेड्यातील लेखक देवा झिंजाड यांच्या गाजलेल्या मराठी कादंबरी ‘एक भाकर तीन चुली’ने राज्यभरातील वाचकांची मने जिंकली आहेत. या बहुचर्चित कादंबरीचा हिंदी अनुवाद ‘एक रोटी तीन चूल्हे’ या नावाने प्रकाशित झाला असून, त्याचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
देवाजींची साहित्यातील उंची दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांना त्यांचे मित्र व पारनेर वाशी तृप्ती फिल्म प्रोडक्शन ची निर्माते रामदास राऊत सर हे नेहमी त्यांच्या संपर्कात असून त्यांच्या कार्याचा गौरव नॅशनल लेव्हलवर होत असल्याने आम्हा पारनेर वाशी यांना देवाजींचा मनापासून खूप स्वाभिमान वाटतो त्यांच्या या कार्याला आम्ही सुयश चिंतितो
मुंबई येथील सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे. सोमैया स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर आयोजित राष्ट्रीय बहुभाषी संगोष्ठी व लेखक–अनुवादक संवाद कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध कथालेखिका सूर्यबाला, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण सिंह आणि हिंदी अनुवादक डॉ. गोरख थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला देशभरातील लेखक, अनुवादक, संशोधक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कादंबरीतील ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, मानवी संघर्ष आणि त्याचे हिंदी भाषेतील रूपांतर या विषयांवर सखोल चर्चा झाली. हिंदी आवृत्तीमुळे मराठी साहित्याचा आशय अधिक व्यापक प्रमाणात हिंदी वाचकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या पुस्तकाचे प्रकाशन My Mirror Publishing House यांनी केले असून, मराठी साहित्याला राष्ट्रीय व्यासपीठावर नेणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. गारखिंडीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला देवा झिंजाड यांचा साहित्यप्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.









