शहादा, दि. १५ : राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी वरील प्रकाशा गावाजवळ तापी नदीवर असलेल्या जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करून आगामी गणेश विसर्जनासाठी सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद नगीन पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) नाशिक येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोळदा-खेतीया या राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी शी जोडलेला प्रकाशा येथील तापी नदीवरील जुना पूल हा परिसरातील नागरिकांसह गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून आगामी गणेश विसर्जनाच्या दिवशी या पुलावरून भाविक, गणेश विसर्जन मिरवणुका तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होण्याची शक्यता आहे.
मात्र, पुलाची आवश्यक ती दुरुस्ती अद्याप झालेली नसल्याने गणेशभक्त व स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गर्दीच्या काळात पुलावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव व विसर्जनाचा कालावधी लक्षात घेता या प्रश्नाकडे अत्यंत तातडीचे काम म्हणून पाहावे. संबंधित अधिकाऱ्यांनी तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. तसेच गणेश विसर्जन काळात वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रा. मकरंद पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (मुंबई) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडेही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.





