
शहादा, दि. १६ (का. प्र.) : पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शहादा येथील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत पर्यावरणपूरक बीजगणपती निर्मितीचा अभिनव उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या मूर्तींमध्ये विविध वनस्पतींच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर बीजगणपतींचे विसर्जन केल्यानंतर त्यातील बियांपासून नवीन रोपांची निर्मिती होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
‘भक्तीही जपूया आणि पर्यावरणही वाचवूया’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श समाजासमोर ठेवला. ‘विसर्जनातून निर्मितीकडे आणि भक्तीतून हरित भविष्याकडे’ या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा ठरला.
राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ सेवा देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविणारे प्रभावी माध्यम असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
सदर उपक्रम महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती कल्पना पाटील, पर्यवेक्षक के. एच. नागेश आणि ज्येष्ठ प्रा. व्ही. सी. डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मधुकर ठाकरे यांनी केले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. एल. व्ही. बोरसे, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा. योगिता पाटील, प्रा. पंकज गुरव, प्रा. जयेश पाटील आणि प्रा. प्रकाश चौधरी यांनी विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत साकारलेल्या या सर्जनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






