प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनिधी पातुर
पातूर तालुक्यातील महसूल विभागाचे प्रमुख कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुकाभरातील हजारो नागरिक विविध कामांसाठी दररोज या कार्यालयात ये-जा करत असतात. मात्र कार्यालयाच्या परिसरातील पुरुष शौचालयात मूत्रविसर्जनाच्या जागेतच मद्याच्या (टँगो कंपनीच्या) रिकाम्या काचेच्या बाटल्या मुद्दाम अडकवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे तहसील कार्यालयाच्या स्वच्छता व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या महत्त्वाच्या सरकारी कार्यालयात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कार्यालयात तहसीलदारांसह विविध वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असताना शौचालयात असा प्रकार नेमका कसा घडला? संबंधित बाटल्या कोणी ठेवल्या? त्या किती दिवसांपासून तशाच आहेत? तसेच स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई केली जाते की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, कार्यालयात महिला कर्मचारी तसेच महिला नागरिकही मोठ्या संख्येने येत असतात. अशा निष्काळजीपणामुळे कार्यालयाच्या परिसरातील सुरक्षितता आणि शिस्त याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी, तसेच तहसील कार्यालयातील स्वच्छता व्यवस्था सुधारून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









