नांदेड व यवतमाळ जिल्हा प्रशासनाचा संयुक्त निर्णय; अनधिकृत मोटार पंप व वीज जोडण्या जप्त करण्याची मोहीम राबविणार
उमरखेड :
इसापूर धरणातील उपलब्ध पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार धरण परिसरातील अनधिकृत मोटार पंप तसेच विद्युत जोडण्या शोधून जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. पैनगंगा प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर काटकसरीने व्हावा, यावर विशेष भर देण्यात येत आहे.
पाणी चोरी रोखण्यासाठी महसूल व महावितरणची संयुक्त यंत्रणा
अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल विभाग आणि महावितरण विभागाचे अधिकारी संयुक्तपणे नदीपात्राची दररोज पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान अनधिकृत मोटार पंप किंवा वीज जोडण्या आढळल्यास त्या जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्या ठिकाणचा पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासंदर्भात गावातील तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कार्डिले आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याचे नियोजन, अनधिकृत उपसा रोखणे आणि शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचे योग्य वाटप करणे यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून तिचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे इसापूर धरण परिसरातील अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.









