दुष्काळ संपेपर्यंत कृषी पंप व गरीब कुटुंबांचे वीज कनेक्शन खंडित करू नये; अकोट महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
अकोट : प्रतिनिधी
अकोट तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीकडून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कृषी पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन खंडित करण्याची मोहीम सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. दिवाळी आणि सणासुदीच्या काळात अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित करणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ४ नोव्हेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. दुष्काळ संपेपर्यंत शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि गरीब कुटुंबांचे घरगुती वीज कनेक्शन खंडित करू नयेत, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शेतातील कृषी पंपांचे वीज कनेक्शन खंडित झाल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीजपुरवठा बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेक गरीब कुटुंबांना घरगुती वीजबिल भरणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात घरातील वीज कनेक्शन तोडल्यास नागरिकांना अंधारात सण साजरा करण्याची वेळ येईल, अशी चिंता वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांचा आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
स्मार्ट मीटरच्या स्वयंचलित प्रणालीवर आक्षेप
महावितरणने बसविलेल्या स्मार्ट मीटरमध्ये वीजबिल न भरल्यास स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित होण्याची प्रणाली असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. ही प्रणाली गरीब शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी अडचणीची ठरू शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा मानवी हस्तक्षेप न होता दिवाळीसारख्या सणाच्या काळात घरातील वीजपुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याने ही स्वयंचलित वीज खंडित करण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत तसेच सणासुदीच्या काळात शेतकरी आणि गरीब कुटुंबांचा वीजपुरवठा सुरक्षित ठेवावा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे मांडली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे, काशीराम साबळे, मंगेश चिखले, संदेश घनबहादुर, रमेश सरकटे, संभा थोरात, निखिल गावडे, संजय पुंडकर, संजय बुध, मंदा कोल्हे, सुनिता हिरोळे, लता कांबळे, सुनिता वानखडे, स्वाती चिखले, डॉ. अनिल गणगणे, अमन गवई, आशिष रायभोल, प्रेमराज भटकर, पंजाबराव पाचपाटील, स्वप्निल घनबहादुर, मयूर सपकाळ, डॉ. श्याम नेमाडे, राजेश वानखडे, मंगेश कांबळे, अतुल अढाऊ, गोपाल ढोरे, दादु निताळे, नरेश खरात, लखन इंगळे, इम्रान पठाण, सुनिल घनबहादुर, स्वप्निल दहिभात, रजित सरकटे, संदीप आग्रे, धिरज सिरसाट, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, दिपक तेलगोटे, विकी धांडे आणि गजानन दौड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.








