रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील पुनखेडा ते पाटोंडी रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर-मलकापूर महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून, काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची सध्याची दुरवस्था पाहता पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाली असून, शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी रस्त्याचे काम तातडीने सुरू करून दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच काम रखडविणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असताना प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास ग्रामस्थ व शेतकरी तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रस्त्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू करते, याकडे पुनखेडा-पाटोंडी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











